Advertisement

बीड, लातूरसह 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट

प्रजापत्र | Friday, 05/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.5 नोव्हेंबर – राज्यात ऐन दिवाळीच्या काळात काही ठिकाणी पाऊस पडला. तर पुढील चार दिवसात अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बीड,लातूर उस्मानाबादसह 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्येही मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होत आहे. कोकणातील काही ठिकाणी ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावली आहे. आताही पुढील काही दिवसात पाऊस होण्याचा अंदाज आहे. साधारणपणे या काळात पाऊस होत नाही, असा अनुभव आहे. यंदा मात्र हवामानात बदल झाला आहे. देशात मान्सून बराच काळ राहिला आहे. तसेच चक्रीवादळांचाही परिणाम झाला आहे. चक्री वादळामुळे तर ऐन उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडला होता. त्यानंतर मान्सूनमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

 

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. उद्या राज्यात पावसाचा जोर मंदावणार असून कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्या पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement