मुंबई: दिवाळीतील नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने देशवासीयांना दिवाळीचे बंपर गिफ्ट दिले आहे. पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे संतप्त झालेले देशवासीय आणि रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकरी यांना मोदी सरकारने भेट दिली आहे. यातच आता विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपाला जितक्या वेळा पराभूत कराल, तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील, असे म्हटले आहे.
केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पण ही दर कपात पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे फलित आहे. आता ५ रुपयांची पेट्रोल स्वस्त झाले आहे. पण ५० रुपयांनी स्वस्त करायचे असेल तर आपल्याला संपूर्ण देशभर भाजपाचा पराभव करावा लागेल आणि २०२४ साली ते नक्कीच होईल, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेल आज शंभरी पलीकडे आहे. तुम्ही खरेच मोठ्या मनाचे असता तर पेट्रोल-डिझेल २५ ते ३० रुपयांनी स्वस्त केले असते, असेही राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, देशात आधीच पेट्रोल आणि डिझेलचे १०० रुपयांच्या वर गेले आहेत. त्यात आता केवळ ५ ते १० रुपयांची कपात करण्यात येत आहे. यामुळे देशवासीयांना काहीसा दिलासा मिळू शकेल. मात्र, यात आणखी कपात करणे आवश्यक आहे. तसेच केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी करून चालणार नाही, गॅसच्या किमतीही कमी करायला हव्यात, अशी अपेक्षा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केली.