Advertisement

आनंदाची बातमी, अखेर कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी WHO ची मंजुरी!

प्रजापत्र | Wednesday, 03/11/2021
बातमी शेअर करा

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आणि प्रतीक्षा सुरू असलेला निर्णय अखेर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला आहे. भारतात निर्मिती होणाऱ्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेनं आपातकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. भारतात कोवॅक्सिनचे डोस देण्यास याआधीच सुरूवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याआधीच या लसीला मान्यता दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती. गेल्या अनेक दिवसांपासून या मान्यतेची प्रतीक्षा सगळ्यांना लागली होती. अखेर ती मान्यतेची मोहोर डब्ल्यूएचओनं उमटवली आहे.

यासाठी गेल्याच आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेनं भारत बायोटेककडून लसीविषयी अतिरिक्त माहिती मागवली होती. ही माहिती तपासून पाहिल्यानंतर डब्ल्यूएचओचं समाधान झालं आणि लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार मंडळाची बैठक पार पडली. जगभरातील तज्ज्ञांचा या मंडळात समावेश आहे. या मंडळाकडून कोवॅक्सिन लस करोनाविरोधात प्रवाभी असल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ही लस जागतिक स्तरावर आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिली जाण्यास सुरक्षित असल्याचं डब्ल्यूएचओनं जाहीर केलं.

जागतिक पातळीवर कोवॅक्सिनला आत्तापर्यंत मंजुरी नसल्यामुळे भारतातून परदेशात जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. WHO च्या मान्यतेच्या अभावी निरनिराळ्या देशांनी कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांना त्यांच्या देशात प्रवेश नाकारला होता. तसेच, कोवॅक्सिनचा एकच डोस झालेल्या नागरिकांना दुसरा डोस संबंधित देशात मिळण्यात देखील अडचणी होत्या. मात्र, आता डब्ल्यूएचओनं या लसीला मान्यता दिल्यामुळे कोवॅक्सिन लस घेऊन परदेशी प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोवॅक्सिन ७८ टक्के प्रभावी!
दरम्यान, कोवॅक्सिन करोनाविरोधात ७८ टक्के प्रभावी असल्याचं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे. तसेच दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांनंतर कोवॅक्सिन प्रभावी ठरते. त्याशिवाय, या लसीचे डोस साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुलभ असल्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांसाठी ही लस अतिशय उपयुक्त असल्याचं डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आलं आहे

Advertisement

Advertisement