प्रख्यात रहस्यकथाकार व गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचे आज पुण्यात निधन झाले. नाईक गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र, त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांनी तब्बल बाराशे मराठी कादंबऱ्या लिहल्या आहेत.
त्यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. नाईक यांच्या कादंबर्यांना बाजारात चांगली मागणी होती. गुरुनाथ नाईक हे मराठीतील आघाडीचे रहस्य कथाकार होते. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे होते. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय.
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे 1957 ते 1963 या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या आहेत.