Advertisement

भारताला पाकिस्तानातून पाठवायचेत पाच हजार ट्रक पण…;

प्रजापत्र | Wednesday, 03/11/2021
बातमी शेअर करा

अफगाणिस्तामध्ये धान्य पाठवण्यासंदर्भात सहकार्य करावे यासाठी भारताने पाकिस्तानकडे मागील महिन्यामध्ये एक विनंती केली होती. जमीन मार्गाने म्हणजेच रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून धान्य अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यासाठी पाकिस्तानमधून ट्रक जाऊ द्यावेत अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केलेली. इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी अद्याप याला नाही म्हटलेलं नाही. मात्र त्याचवेळी भारतामधील अधिकाऱ्यांना पाकिस्तानकडून लवकर उत्तर येईल अशी अपेक्षा आहे. पाठवलं जाणारं धान्य हे मदत स्वरुपातील असल्याने पाकिस्तान लवकरच यावर उत्तर देईल अशी अपेक्षा भारताला आहे.

 

भारताने अनेकदा अफगाणिस्तानला आवश्यक ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं आहे. मदत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य पाठवण्याची इच्छा भारताने अनेकदा दिलीय. मात्र जगभरातील भारतीय भारताने तालिबानपासून सावध रहावे असं सांगत असताना सरकारने मात्र अफगाणिस्तानी नागरिकांच्या मदतीसाठी कायम तयार असल्याचे संकेत कृतीमधून दिलेत. याच मदतीचा भाग म्हणून भारताने अफगाणिस्तानमध्ये ५० हजार मेट्रीक टन गहू पाठवण्याची तयारी केली आहे. हा गहू ट्रकमधून अफगाणिस्तानमध्ये पाठवायचा असल्याने हे ट्रक पाकिस्तानमधून जाऊ द्यावेत अशी विनंती दिल्लीने इस्लामाबादकडे केलीय. हिवाळ्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये धान्य तुटवडा निर्माण होऊ शकतो. चीन, टर्कीसारख्या देशांनीही मागील आठवड्यापासून अफगाणिस्तानमध्ये धान्य पाठवण्यास सुरुवात केलीय.

 

 

अफगाणिस्तानमधील लोकांच्या भल्यासाठी भारताला मदत कायची आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात धान्य पाठवताना रस्ते मार्गाचा वापर करुन मदत पाठवायचा भारताचा इरादा आहे. यासाठी ५० मेट्रीक टन गहू घेऊन पाच हजार ट्रकला पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानात पाठवण्याचा विचार आहे. यासाठी भारताने पाकिस्तानकडे विनंती अर्ज केला आहे. मात्र ट्रकची संख्या आणि त्यामधील माल पाहता रस्ते योग्य आहेत की नाही याची चाचपणी करावी लागणार असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्तानने यासाठी संमती दिली नाही तर वाघा अटारी सीमेजवळ सर्व गहू ट्रकमधून उतरवून तो पाकिस्तानी ट्रकमध्ये भरुन पाठवावा लागेल. मात्र यामुळे फार गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानमधील लोकांना मदत करण्यासाठी पाकिस्तान भारताचं सहकार्य करेल अशी अपेक्षा भारतीय अधिकाऱ्यांना असल्यानेच त्यांनी ही विनंती केलीय.

 

पाकिस्तान काय भूमिका घेतोय या बरोबरच अफगाणिस्तान मदत स्वीकारणार की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. तसं तालिबान्यांनी भारताकडून मदत स्वीकारण्याची तयारी यापूर्वी दर्शवली होती. त्यामुळे आता केवळ पाकिस्तानचा होकार ही एकमेव गोष्ट मदत पाठवण्यासाठी होत असणाऱ्या विलंबाला कारणीभूत आहे.

 

Advertisement

Advertisement