Advertisement

अनिल देशमुखांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत

प्रजापत्र | Tuesday, 02/11/2021
बातमी शेअर करा

मुंबई – महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा धडाका लावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिले आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती. बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती

अजित पवार (स्वत:), त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार,  मुलगा पार्थ अजित पवार, आई आशा अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. तसेच गेले १९ दिवस आयकर आणि आता ईडीचे धाडसत्र आणि शोध ऑपरेशन(सर्च) सुरु आहे. १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानं अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

खालील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश

जरंडेश्वर साखर कारखाना – अंदाजित किंमत ६०० कोटी

दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी

पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी

निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट – २५० कोटी

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी – जवळपास ५०० कोटी

Advertisement

Advertisement