गेवराई : बँकेच्या व खाजगी सावकाराच्या कर्जास कंटाळून एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरातील पत्राच्या आडुला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार दि. २८ रोजी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील बागपिंपळगाव येथे घडली. दरम्यान गेवराई तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. रमेश नामदेव पिंगळे (वय 30)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील रहिवासी रमेश नामदेव पिंगळे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्या मागे बँकेचा व खाजगी सावकाराचा सततचा कर्ज मागणीचा तगादा होता, असे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान बुधवारी रमेशची आई नातेवाइकाकडे गावी गेलेली होती, वडील खाजगी जागेवर वाचमन म्हणून कामाला गेले होते. तर लहान मुलगा व पत्नी आपल्या माहेरी गेले होते. याचा फायदा घेऊन रमेश पिंगळे याने घरातील पत्राच्या आडुला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी रमेशचे वडील वाचमनचे काम करुन घरी आल्यावर रमेश पिंगळे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मयत शेतकरी रमेश पिंगळे याच्या पश्चात त्यांना पत्नी, एक मुलगा,आई-वडील असा परिवार आहे.