नवी दिल्ली – रात्रीचे ३ वाजले होते. समोरच्या घरातील काकू माझ्या आईच्या नावानं जोरजोरात आवाज देत होती. मी खडबडून जागा झालो. खिडकीतून डोकावून पाहिलं तर काकू म्हणाल्या, वर पाहा आग लागली आहे. मी तातडीनं वर धावत गेलो. शेजारचेही धावत आले. रुमचा दरवाजा उघडला तेव्हा सर्वत्र धूर पसरला होता. काहीच दिसत नव्हते. आतमध्ये आगीच्या झळा बसत होत्या. आम्हाला आतमध्ये शिरताच येत नव्हतं. आईवडिलांना भाऊ-बहिणीला आवाज देत होतो परंतु कुणीच उत्तर दिलं नाही. आतमध्ये सर्व तडफडत असतील पण आम्ही काहीच करू शकलो नाही.ही वेदना आहे सीमापुरी भागात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूनंतर २२ वर्षीय युवकानं सांगितलेली. आगीच्या धुरात जीव गुदमरल्यानं वृद्ध आई-वडील, भाऊ बहिण यांना २२ वर्षीय अक्षयनं कायमचं गमावलं आहे. क्षणातच अक्षयचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग नियंत्रणात आली नाही. त्यानंतर पोलिसांना कॉल करून माहिती देण्यात आली.तिसऱ्या मजल्यावर वडील पलंगावर झोपत होते. तर आई-बहिण आणि भाऊ जमिनीवर अंथरुण टाकून झोपत होते. मी दुसऱ्या मजल्यावर झोपत होतो. आग लागल्याचं कळताच मी तातडीने वर गेलो. परंतु रुममध्ये खूप धूर पसरला होता. काहीच दिसत नव्हतं. शेजाऱ्यांनी आणि मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतरही काहीच झालं नाही. अखेर जेव्हा धूर कमी झाला तेव्हा चौघं मृत अवस्थेत पडल्याचं दिसून आलं.
भावाचं लग्न ठरलं होतं पण त्याआधीच घडली दुर्घटना
शास्त्रीभवनात शिपाई म्हणून काम करणाऱ्या होरीलाल आणि त्यांची पत्नी स्वच्छता कर्मचारी होते. होरीलाल निवृत्त होणार होते त्यामुळे मोठा मुलगा आशुच्या लग्नाची तयारी सुरू होती. महिपालपूर इथं मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. लग्न ठरलं होतं यंदाच्या डिसेंबर अथवा पुढील जानेवारी महिन्यात तारीख निश्चित करण्यात येणार होती. परंतु त्यापूर्वीच कुटुंब संपलं.
४ वर्षापूर्वी घर खरेदी केलं होतं
नातेवाईक संजय कुमार यांनी सांगितले की, होरीलाल यांचे वडील कर्जन रोडवरील भारतीय विद्या भवनात कामाला होते. ते स्टार्फ क्वॉर्टरमध्ये राहायचे. निवृत्तीनंतर १९९० मध्ये ती सीमापूर भागात आले. त्यांना ४ मुलं होतं. होरीलाल दुसऱ्या नंबरवर होते. याआधी ३ भावांचा मृत्यू झाला होता. होरीलालचं कुटुंब भाड्याने राहत होते. ४ वर्षापूर्वीच होरीललाने एका मालमत्तेत दुसरा आणि तिसरा मजला खरेदी केला होता.