तिरुवनंतपूरमः केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहाःकार उडाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. कोट्टायमला पावसाचा अधिक तडाखा बसला आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे पठानमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.
कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहनं वाहून गेली आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.
तिरुवनंतपूरम, कोल्लम, पठानमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड यासह ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.