Advertisement

'सुशिक्षित असूनही नोकरी का करत नाही?'; पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला!

प्रजापत्र | Wednesday, 13/10/2021
बातमी शेअर करा

औरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पत्नीला नोकरी करुन पैसे आणून का देत नाही, असं विचारत पतीने तिच्यावर चाकूने वार केले आहेत. ही खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास मुकुंदवाडीतील राजीव गांधीनगरात घडली. धनंजय भरत अंबिलवादे असं हल्ला करणाऱ्या पतीचं नाव आहे.

 

 

धनंजय याने पत्नीशी जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद घातला. यावेळी त्याने तुझे शिक्षण एमएपर्यंत झालेले आहे. मग तू नोकरी का करत नाही? मला पैसे आणून देत नाही? असे प्रश्न विचारत शिवीगाळ केली. तेव्हा नोकरी लागल्यानंतर पैसे आणून देते, असं समजावून सांगत असलेल्या पत्नीला तुला ठार मारतो, असं धमकावत त्याने गळ्यावर चाकूने वार केला. मात्र, हा वार पत्नीने हाताने हुकवला. त्यात तिच्या उजव्या हाताला व गळ्याला जबर जखम झाली.

हा प्रकार सुरू असताना पीडित पत्नी वारंवार विनवणी करत होती. मात्र, धनंजय तिच्यावर एकसारखे वार करत होता. याच दरम्यान त्याने डोक्यात आणि पोटात देखील वार केला. यावेळी शेजाऱ्यांनी धाव घेत धनंजयला रोखले. त्यानंतर विवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर मुकुंदवाडी पोलिसांनी धाव घेत विवाहितेच्या तक्रारीवरुन पती धनंजय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक व्ही. एम. गुळवे या करत आहेत.
 

Advertisement

Advertisement