सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खुर्ची लावण्यात आली होती तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे यांनी सोबत दीपप्रज्वलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
विमानात काय काय झालं ?
शिवसेनेचे आमदार मंत्री मागच्या बाजूला होते. तर भाजपचे आमदार, नेते, राणे पुढच्या रांगेत होते. विमानप्रवासात मराठीत घोषणा झाली तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि जयघोष केला. विमान सुरु होताच खासदार विनायक राऊतांनी पेढे वाटले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विनायक राऊतांनी पेढे दिले. “गोड घ्या आणि गोड गोड बोला” असं विनायक राऊतांनी राणेंना म्हटलं. राणेंनीही आपणही गोड गोड बोलावं असा संवाद झाला.
डिजीसीएकडून सर्व परवानग्या
तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने 2018 साली गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मूर्ती घेऊन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभूही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण नसल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमानतळास परवानगी मिळाली नव्हती. आता विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने डिजीसीएकडून सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले.