मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्य सरकार सजग आहे. तिसरी लाट येऊ नये व करोना हद्दपार व्हावा या दृष्टीनं सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निश्चित केलं असून 'मिशन कवच कुंडल' या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. त्यानुसार, उद्या ८ ऑक्टोबरपासून ते १४ ऑक्टोबर असे सात दिवस राज्यात 'मिशन कवच कुंडल' राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत राज्यात दररोज किमान १५ लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात येईल, असं टोपे म्हणाले. 'येत्या दसऱ्यापर्यंत देशात १०० कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे. राज्य सरकारनं प्रयत्न केल्यास केंद्र सरकारला हे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. केंद्र सरकारनंही राज्याकडून तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्य सरकारनं जय्यत तयारी केली आहे. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आजही कमी पडलेला नाही. यापुढंही तो कमी पडू नये हाच सरकारचा प्रयत्न आहे,' असं टोपे म्हणाले.
'कोविड लसीच्या उपलब्धतेची परिस्थिती आता बदलली आहे. पूर्वीसारखा लसींचा तुटवडा नाही. आज या क्षणाला राज्याकडं लसीचे जवळपास ७५ लाख डोस आहेत. आणखी २५ लाख डोस आज मिळणार आहेत. येत्या सहा दिवसांत हा साठा संपवायचा असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे,' असं टोपे म्हणाले.