Advertisement

‘तारक मेहता' मधील ‘नट्टूकाका’ काळाच्या पडद्याआड

प्रजापत्र | Sunday, 03/10/2021
बातमी शेअर करा

मुंबई-छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील ‘नट्टू काका’ हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाची झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून त्यांनी रविवारी (३ ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला.
            ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी नट्टू काका यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आसित कुमार मोदी यांनी ट्वीट केले आहे. ‘ॐ शान्ति’ असे ट्वीट करत नट्टू काका यांचा फोटो ट्विटरवर शेअर केले आहे.
नट्टू काका हे गेल्या ५५ वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत होते. मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. नट्टू काका यांचे संपूर्ण नाव घनश्याम नायक असे आहे. मात्र सिनेसृष्टीत सर्वचजण त्यांना नट्टू काका याच नावाने हाक मारायचे. नट्टू काका हे तारक मेहता या मालिकेत सुरुवातीपासून जोडलेले होते. त्यांच्या कॉमेडीमुळे अनेकजण पोट दुखेपर्यंत हसले आहेत. नट्टू काका या शोमध्ये जेठालालच्या दुकानात त्यांचे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते. नट्टू काका आणि बागा या दोघांची जोडी फार प्रसिद्ध होती.
घनश्याम नायक यांनी जवळपास 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. इतकंच नव्हे तर अनेक बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले होते. सलमान खानच्या ‘हम दिल दे चुके सनम’, ‘तेरे नाम’ यासारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. त्यासोबतच ‘चोरी चोरी’, ‘खाकी’ या चित्रपटातही त्यांची छोटीशी भूमिका साकारली होती. तसेच नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मासूम’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणूनही ते झळकले होते.

Advertisement

Advertisement