Advertisement

डांबरीकरणाचा शुभारंभ करायचा तर घ्या गडकरींची परवानगी

प्रजापत्र | Friday, 01/10/2021
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी)-मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेल्या बीड शहरातून जाणाऱ्या जिरेवाडी ते कोल्हारवाडी  रस्त्याच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली आहे. लातूरच्या कंत्राटदाराला काम  देण्यात आले आहे. मात्र आता या रस्त्याच्या डांबरीकरण कामावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आ. संदीप क्षीरसागर यांच्या विनंतीनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाने या रस्त्याचा शुभारंभ करता येईल का अशी विचारणा बीडच्या  जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. यावर हे  काम केंद्र सरकारचे आहे, त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांची परवानगी घ्या असे पत्रच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. त्यामुळे आता काम सुरु होण्यापूर्वीच श्रेयवाद रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

 

बीडला औरंगाबाद -येडशी महामार्गावर वळण रस्ता झाल्याने जिरेवाडी ते कोल्हारवाडी  हा जुना रस्ता दुर्लक्षित झाला होता.  या स्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी मोठ्याप्रमाणावर होत आलेली आहे. यासाठी अनेकांनी आंदोलने देखील केली आहेत. आता अखेर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. वन टाइम इम्प्रुव्हमेंट योजनेतून हा १० किलोमीटरचा डांबरी रस्ता मंजूर करण्यात आला असून त्यासाठी नैवैद काढण्यात आली होती. लातूरच्या कंत्राटदाराला सदर निविदा देखील मंजूर झाली आहे.
मात्र आता याच्या शुभारंभावरून नवीन वाद होण्याचे संकेत आहेत. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते व्हावा यासाठी बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांना पात्र दिले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री कार्यालयाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पात्र दिले आहे. त्यात या रस्त्याच्या कामाच्या सद्यस्थितीची माहिती असून शुभारंभाच्या विषयावर मात्र हे काम केंद्र सरकारचे आहे, त्यामुळे केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या कार्यालयाची अर्थात नितीन गडकरींची परवानगी घ्या असे सांगितले आहे. त्यामुळे आता रस्ता होण्यापूर्वीच श्रेयवाद रंगणार असल्याची चिन्हे आहेत.

Advertisement

Advertisement