मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी देशभरामध्ये झालेल्या विक्रमी लसीकरणाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करणारी प्रकरण आता समोर येत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याची माहिती समोर येत असून यासंदर्भात दर कारवान या मासिकाने एक वृत्त प्रकाशित केलं आहे.यामध्ये लस न घेताच सर्टिफिकेट पाठवण्यात आलं, चौकशी करणाऱ्यांना शांत राहा असा सल्ला देत वाटेल तेव्हा येऊन लस घ्या असं देखील सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
देशभरामधील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांचे अनुभव या लेखामध्ये सांगण्यात आले आहेत. अनेकांनी १७ सप्टेंबरच्या आधी लस घेतल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र देण्यात आल्याची प्रकरण समोर आलीय. काहींना तर दुसऱ्या लसीचा डोस न घेताच १७ तारखेला डोस देण्यात आल्याचं सर्टिफिकेट पाठवण्यात आलं आहे. याचसंदर्भात स्क्रोलने दिलेल्या वृत्तानुसार बिहारमधील अनेक ठिकाणी लोकांना १५ आणि १६ सप्टेंबर रोजी लस देण्यात आली असली तरी कोविनच्या पोर्टलवर त्यासंदर्भातील माहिती १७ सप्टेंबरला अपलोड करण्यात आलीय. कोविनवरील माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरामध्ये अडीच कोटी डोस देण्यात आले. मात्र त्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये देशभरामध्ये रोज जवळपास ७६ लाख लसी दिल्या जात असल्याचं कोविनवरील डेटावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेच १७ सप्टेंबर रोजी जास्त लसीकरण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं होतं का याबद्दल प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
गुजरातमध्ये काय घडलं ?
गुजरातमधील हुसैन बाजी यांना १७ सप्टेंबर रोजी लस न घेताच लस घेतल्यासंदर्भातील सर्टीफिकेट मिळालं. गुजरातमधील दाहोडमधील लसीकरण केंद्रावर त्यांनी लस घेतल्याचं दाखवण्यात आलेलं. “या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी वडोदऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेतला होता. मात्र प्रमाणपत्रामध्ये मी माझ्या मूळ गावी डोस घेतल्याचं दाखवण्यात आलंय, जेव्हा की मी त्या दिवशी गावी नव्हतोच,” असं बाजी म्हणाले आहेत. याच पद्धतीने आपल्या ओळखीतील सात ते आठ लोकांना सर्टिफिकेट आल्याची माहिती बाजी यांनी कारवानशी बोलताना दिलीय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मौन
बिहारमधील राजू कुमार यांच्यासोबतही असाच प्रकार घडलाय. हिलसा येथे राहणाऱ्या कुमार यांना १५ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून फोन आला आणि तुम्ही या आठवड्यामध्ये कधीही लसीचा दुसरा डोस घेऊ शकता असं सांगण्यात आलं. “मात्र १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता कुमार यांना एक नोटीफिकेशन आलं ज्यात त्यांनी लस घेतल्याचं सांगण्यात आलेलं. मात्र त्यांना सर्टिफिकेट डाऊनलोड करता येत नव्हतं,” असं वृत्तात म्हटलं आहे. यानंतर कुमार यांनी केंद्रावर फोन केला असता, “शांत राहा आणि वाटेल तेव्हा केंद्रावर येऊन लस घेऊन जा,” असं सांगण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आलाय. मात्र यासंदर्भात संबंधित केंद्रांनी किंवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बोलण्यास नकार दिल्याचं कारवानने म्हटलं आहे.