मुंबई: आता कुठे पाऊस उसंत घेतो म्हणता म्हणता पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका आहे. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ओडिशा, आंध्र प्रदेश, कोलकाता यासह अनेक भागांना चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो असं सांगण्यात आलं आहे. पूर्व मध्य बंगालच्या खाडीतून हे चक्रीवादळ पुढे सरकत असल्याचा हवामान विभागाने माहिती दिली आहे.
आंध्र प्रदेश, कोलकाताच नाही तर महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील गड़चिरोलीसह आजूबाजूच्या भागांत या चक्रीवादळामुळे वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोलकाता, पूर्व मिदनापूर, उत्तर २४ परगना दक्षिण २४ परगनासह पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये या चक्रीवादळाचा तडाखा बसू शकतो.
या भागांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. के एस. होसाळीकर यांनी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 6 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रिवादळ होण्याची शक्यता आहे. उ आंध्र प्रदेश - द ओडीशा किनारपट्टी भागात 26 सप्टेंबर संध्याकाळी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, पुढच्या १२ तासात अजून तीव्र होण्याची व ४८ तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता. ह्यामुळे राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
महाराष्ट्रातही काही भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्य़ात आला आहे. यंदा परतीचा पाऊस लांबणीवर गेला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसानं अनेक भागांमध्ये पुरसदृश्यं स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.