Advertisement

गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या वृद्धेस केले जेरबंद

प्रजापत्र | Saturday, 25/09/2021
बातमी शेअर करा

बीड - गुप्त माहितीच्या आधारे बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून बीड शहरातील पेठ बीड भागातून जवळपास ३५ हजारांच्या साडेतीन किलो गांजासह एका ६० वर्षीय वृद्धेस ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या वृद्धेने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने स्वतःच्या घरात गांजा लपवून ठेवल्याचे तपासातून समोर आले आहे. 

 

शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड शहरातील अवैध धंद्यावर छापे मारण्याच्या उद्देशाने रवाना झाले होते. यावेळी त्यांना बार्शी नाका परिसरातील रहिमदबी अमानुल्ला पठाण (वय ६०) ही महिला स्वतःच्या घरातून बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ असलेल्या गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास खबर मिळालेल्या ठिकाणी पंचांना सोबत घेऊन छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी रहिमदबी अमानुल्ला पठाण ही महिला दिसून आली. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजुस बारीक लाकडाच्या खाली प्लास्टीकच्या रॅपरमध्ये गुंडाळेल्या स्थितीत एक पॅकबंद आणि एक अर्धे उघडलेले पाकीटात एकूण ३४ हजार ६४० रुपये कितींचा साडेतीन किलो गांजा आढळून आला.  पोलिसांनी गांजा जप्त करून त्या वृद्धेस ताब्यात घेतले. या प्रकरणी एलसीबीचे पोलीस उपनिरिक्षक भगतसिंग दुलत यांच्या फिर्यादीवरून रहिमदबी अमानुल्ला पठाण हिच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, उपअधीक्षक संतोष वाळके, एलसीबीचे पोलीस निरिक्षक सतीश वाघ, सपोनि डी.बी.कुकलारे, पीएसआय दुलत, सहा. फौजदार खेडकर, पोलीस कर्मचारी वाघ, वाघमारे, शिंदे, गायकवाड, महिला कर्मचारी जाधवर यांनी पार पाडली.

Advertisement

Advertisement