मुंबई: 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदर्भातील बातम्यांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा व धमक्या दिल्याचा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या अरेरावीचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांच्या अरेरावीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. 'पत्रकार हे त्यांचं काम करत असतात. शिवाय लालबागमध्ये गेलेल्या पत्रकारांकडं अधिकृत पास होते. सर्व नियमांचं पालन करून ते काम करत होते. असं असतानाही त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली हे निषेधार्हच आहे. तो व्हिडिओ मी स्वत: पाहिला. 'हात काय, पायही तोडू' असे डायलॉग काही पोलीस अधिकारी मारताना त्यात दिसत आहेत. हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे. खरंतर तिथं गर्दी झाली होती अशातलाही काही भाग नाही. त्यामुळं इतकी दंडुकेशाही योग्य नाही. ह्या दंडुकेशाहीच्या जोरावर कुणी कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर बरं नाही,' असं फडणवीस म्हणाले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे, पण त्या आधी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.
प्रजापत्र | Friday, 10/09/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा