मुंबई (दि. 06) - अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगड त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नारायण गड येथील विविध विकास कामांना निधी मिळवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आमदार महोदयांच्या समवेत याबाबत मा. उपमुख्यमंत्री महोदयांकडे याबाबत विनंती केली होती.
उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत ही बैठक उद्या दुपारी मंत्रालयात होणार असून या बैठकीत तीनही गडांच्या विकासासाठी आवश्यक निधीचा प्रश्न सुटणार असल्याची अपेक्षा आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार, आ. प्रकाश दादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे काका, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. विनायक मेटे यांसह संबंधित विभागांचे सचिव स्तरावरील अधिकारी व त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
बीड-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील श्री क्षेत्र भगवान गड, बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नारायणगड या तीनही गडांचे धार्मिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्व आहे. या तीनही गडांवर श्रद्धा असलेले लाखो भाविक दर्शनासाठी जात असतात. या ठिकाणी विविध विकासकामे व पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी भरीव निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार उद्याच्या बैठकीत निधीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.