शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं मोठं वृत्त सध्या समोर येत आहे. राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊत यांच्या घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलं आहे. त्याचसोबत, डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. राऊत यांच्या या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा या दोघांनीही सांगितलं होतं. त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं दिसून येत आहे.