Advertisement

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक 

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

 

 

टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.

 

३४ वर्षीय भाविनाबेनने शनिवारी क्लास ४च्या उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता. भाविनाने भारतीय शिबिरातील सर्वांना चकित करून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने पराभूत केले होते.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लहान किराणा दुकान चालवणाऱ्या हसमुखभाई पटेल यांची मुलगी असलेली भाविना सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात होती पण अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूनकडून पराभव झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भाविनाच्या या उत्कृष्ट कामगिरीने कामगिरीने इतिहास रचला आहे.

 

 

२०१७मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची तिसऱ्या क्रमांकाची लढत रद्द करण्याची विनंती आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मान्य केली. त्यामुळे उपांत्य लढतीमधील दोन्ही पराभूत स्पर्धकांना कांस्यपदक दिले जाऊ लागले.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भाविनाने ब्राझिलच्या जॉयसे डी ऑलिव्हेराचा १२-१०, १३-११, ११-६ असा २३ मिनिटांत पराभव केला. गटसाखळीमधील दोन्ही सामने गमावल्यामुळे गुरुवारी सोनल पटेलचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे टेबल टेनिसमध्ये एकमेव भाविनाचे आव्हान टिकून होते.

 

 

 

Advertisement

Advertisement