अविनाश इंगावले
गेवराई- बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसापूर्वी फेटाळ्यानंतर अखेर गुरुवारी (दि.२६) गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला ताब्यात घेतले आहे.थोड्यावेळात आरोपीला गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाळ लैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल करत बीड जिल्ह्यात खळबळ उडवली. माझ्या मृत्युला गावातील काही राजकीय व्यक्ती,पत्रकार,पीडित कुटूंब जबाबदार आहे.अवघ्या पाच मिनिटात मी गळफास लावणार असल्याचा तो व्हिडिओ बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणार होता.यानंतर महाराजांनी धूम ठोकली.दोन दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केल्यानंतर हा जामीन फेटाळण्यात आला.यानंतर गुरुवारी पोलिसांनी महाराजाला ताब्यात घेतले आहे. गेवराईच्या न्यायालयात थोड्यावेळात हनुमान गिरीला घेऊन जाण्यात येईल अशी माहिती चकलांबा पोलीसांनी दिली आहे.
पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला हनुमान गिरी ?
मागील चार महिन्यांपेक्षा अधिक काळापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या हनुमान महाराजाला गेवराई पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे सांगितले जात असताना हनुमान गिरी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आपल्याला जामीन आता मिळणार नाही हे ओळखून हनुमान गिरी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची चर्चा सुरु आहे.तर पोलिस मात्र आरोपीला अटक केल्याचे सांगत असून कारवाईचे ठिकाण मात्र सांगता येणार नसल्याचे म्हणत आहेत.