दिल्ली- देशात कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ६० कोटी नागरिकांनी कोरोनाच्या लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतले आहेत. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना लसीकरणाबाबत सूचना केली आहे. शिक्षक दिनापूर्वी सर्व शाळांच्या शिक्षकांना प्राधान्याने लस देण्यासाठी प्रयत्न करावं, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं अनेक स्तरातून स्वागत केलं जात आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोनावरील लसीकरणाबाबत एक ट्वीट केलं आहे. या महिन्यात प्रत्येक राज्यांना लस उपलब्ध करण्याच्या योजनेअंतर्गत अतिरिक्त २ कोटींहून अधिक कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती मांडवीय यांनी ट्वीट करून दिली.
देशात दरवर्षी ५ सप्टेंबरला देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मांडवीय यांनी ट्वीट करून राज्यांना आवाहन केलं आहे. या वर्षी शिक्षक दिनाला प्राधान्याने सर्व शाळांच्या शिक्षकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्नन करावं, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे.