Advertisement

 दहीहंडीवर निर्बंध कायम

प्रजापत्र | Monday, 23/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव नेहमीच्या जल्लोषात होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत.  
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळं राज्य सरकार प्रत्येक गोष्टीत पूर्ण मोकळीक देण्यास तयार नाही. मात्र, सण-उत्सवावर राज्य सरकारनं निर्बंध लादू नयेत, असा विरोधकांचा आग्रह आहे. तर, छोट्या प्रमाणात का होईना, पण दहीहंडी साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गोविंदा पथकांनी राज्य सरकारकडं केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांसोबत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी गोविंदा पथकांना संयम राखण्याचं आवाहन केलं.

 

'जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि करोनाला पहिले हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्रानं जगाला द्यावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी देखील या कळकळीच्या आवाहनास प्रतिसाद दिल्याचं समजतं. करोनाचं सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.
राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून सर्व निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथील करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र, धार्मिक स्थळं अद्याप बंद आहेत. त्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. आता दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यासही राज्य सरकार तयार नसल्याचं स्पष्ट झाल्यानं भाजप काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलं आहे.

 

 

हेही वाचा... 
 जिल्ह्याची कोरोनमुक्तीकडे वाटचाल 
http://prajapatra.com/2942

 

Advertisement

Advertisement