महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा येत्या १७ ऑगस्टपासून उघडणार आहेत. यासाठी ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग करण्यात आले आहेत. तसेच अंतिम निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण भागात 5 वी ते 8वीच्या शाळा उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हा आणि स्थानिक पातळीवर याचा निर्णय घ्यायचा आहे, असे सरकारने म्हटले आहे.
शिक्षकांचे लसीकरण करणे, पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश बंदी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका बेंचवर एकच विद्यार्थी, वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, लक्षण दिसल्यास घरी पाठविणे, कोरोना चाचणी करणे, कोरोना पॉझिटिव्ह आल्यास वर्गाचे निर्जंतुकीकरण करणे आदी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.