हिंगोली: हिंगोली दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांना अपघात झाल्याचे वृत्त आहे. राज्यपाल कोश्यारी हे नरसी नामदेवकडे जात असताना हा अपघात झाला. यात तीन गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
राज्यपाल कोश्यारी यांचं आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला हिंगोलीत आगमन झाले. ते औंढा नागनाथ मार्गे हिंगोलीत दाखल झाले. तेथे त्यांनी एक बैठक आयोजित करत जिल्ह्यातील सोयी-सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या स्थितीबाबत माहिती घेतली.
या बैठकीनंतर राज्यपाल नरसी नामदेवकडे रवाना झाले. नरसी नामदेव येथे राज्यपालांच्या गाड्यांचा ताफा पोहोचताच ताफ्यात असलेल्या अग्निशमन विभागाच्या गाडीचे ब्रेक फेल झाले. यामुळे हे वाहन पुढील गाडीवर जाऊन आदळले. या धडकेमुळे ताफ्यातील दोन गाड्यांचे नुकसान झाले. राज्यपालांची गाडी मात्र या तिन्ही गाड्यांपेक्षा दूर होती. त्यामुळे राज्यपालांच्या वाहनाला काहीही धक्का लागला नाही.
नरसी नामदेव येथे मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन राज्यपाल कोश्यारी औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या पायरीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राज्यपाल परभणी जिल्ह्याकडे रवाना होत आहेत.
हेही वाचा ...
बजरंग लढला, पण 'सुवर्ण'शर्यतीतून बाहेर पडला
http://prajapatra.com/2836