Advertisement

भीषण अपघातात चार तरुण ठार

प्रजापत्र | Friday, 23/07/2021
बातमी शेअर करा

 

 

उस्मानाबाद दि.२३ जुलै - तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने निघालेल्या मालेगाव जिल्ह्यातील चार तरुणांचा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावानजीक झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. बीड-उस्मानाबाद महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
 तिरुपती देवदर्शनासाठी निघालेल्या तरूणांचा टेम्पो ट्रॅव्हलर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील  उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावानजीक आल्यानंतर चाक फुटले. ते बदलण्यासाठी चालकाने वाहन बाजूला घेतले होते. चाक बदलत असतानाच बीडकडून उस्मानाबादच्या दिशेने भरधाव आलेल्या (एमएच २० इजी १५१७) क्रमांकाच्या टेम्पोने पाठीमागून भाविकांच्या वाहनास जोराची धडक दिली.

 

 

या अपघातात  वाहनातील भाविक शरद विठ्ठलराव देवरे (४४, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (४६, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (५०, रा. दरेगाव, ता. मालेगाव) हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७, दोघेही रा. सायने बु.) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सोलापूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. चालकाविरुध्द येरमाळा पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

मालेगावात शोककळा
या अपघातात टेम्पोसमोर बसलेले चौघे तरुण जागीच ठार झाले. सर्व तरुण ४०ते ४५ वयोगटातील व्यावसायिक होते. कुटुंबातील कर्त्या तरुणांच्या निधनामुळे शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेमुळे चाळीसगाव फाट्यावरील सर्व व्यवसायीकांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. फाट्यावर आज शुकशुकाट होता. अपघाताचे वृत्त समजताच शहरातील जतीन कापडणीस, राजेंद्र पवार, सतीष गिते आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरूणांचे शव दुपारपर्यंत मालेगावी आणण्यात येतील.

 

Advertisement

Advertisement