Advertisement

हृदयद्रावक! शॅाक लागून मायलेकरांचा मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 20/07/2021
बातमी शेअर करा

 

 

कोल्हापूर: कागल तालुक्यातील बाचणी येथील मायलेकरांचा खांबावरील विजेची प्रवाहीत तार तुटून अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गीता गौतम जाधव (वय ३९) आणि मुलगा हर्षवर्धन जाधव (वय १४) अशी मृतांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत मृत गीता यांची १० वर्षाची मुलगी बचावली. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून घटनास्थळी पोलिस निरीक्षक दतात्रय नाळे यांच्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. 

 

याबाबत अधिक माहिती अशी, गौतम जाधव यांचे बाचणी- व्हनाळी रस्त्याच्या आतल्या बाजूला शेतात घर आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास   गीता जाधव ह्या मुलगा हर्षवर्धन व मुलगी गौरी यांच्यासह घराच्या मागील बाजूस ऊसाच्या शेती पलिकडे असलेल्या तळे नावाच्या शेतातील विहीरीत धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या धुणे धुवून ऊसाच्या शेतातून घराकडे परत येत असताना मुलगी गौरी पुढे, मध्यभागी मुलगा हर्षवर्धन व सर्वात शेवटी आई असे थोडे अंतर राखुन तिघेही चालत येत होते. दरम्यान विद्युत खांबावरील प्रवाहित विजेची तार तुटून गीता यांच्या अंगावर पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आवाज आल्याने मध्यभागी असणारा हर्षवर्धन तातडीने मागे पळाला. कांही समजायच्या आत तोही विद्युत तारेला चिकटला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला.

 

ही घटना घडेपर्यंत गौरी घरी परतली होती. परंतू आई आणि भाऊ अजून का आले नाहीत म्हणून ती पुन्हा त्यांना बघायला गेली. यावेळी विजेच्या तारेला चिकटून आई व भाऊ निपचित पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. यावेळी भितीने तिने आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याने शेजारी, शेतातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटाना पाहून दुरध्वनीद्वारे संपर्क साधून विद्युत पुरवठा त्वरीत खंडीत करण्यात आला. घटनास्थळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भेट देवून सदर कुटुंबीयांस तातडीची मदत केली. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील गौतम जाधव यांचा एकुलता एक मुलगा व पत्नीचा आकस्मिक दुदैवी मृत्यू झाल्याने घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. तर गौतम यांनी फोडलेला हंबरडा पाहून पोलिस व वीज कर्मचाऱ्यांसह उपस्थितांचे डोळे आपसुकच पाणावले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

मुलीचा समंजसपणा...

ही घटना घडत असताना गौतम जाधव हे घरी वैरण आणून ते ठेवण्याचे काम करत होते. त्यामुळे त्यांना याची जराही कल्पना आली नाही. १० वर्षाची मुलगी गैारी हिने जेवढ्या तातडीने घटना बघून पुढे न जाता आरडाओरडा करून सामंजसपणा दाखवला, त्यामुळेच तिचा जीव वाचल्याची चर्चा घटनास्थळी होती.
 

Advertisement

Advertisement