आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. तर, यामुळे संजय राठोड यांना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे, राज्यात एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हेच जबाबदार असल्याचे बोलले गेले. या आरोपामुळे राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर, आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे जबाब नोंदविला असल्याची माहिती समोर आली आहे.
या जबाबाबद्दल झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आमची कोणत्याही व्यक्ती विरोधात तक्रार नसल्याचे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाचा आमचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.आता या जबाबामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना या प्रकरणातून एकाप्रकारे क्लिन चिट मिळाल्याचेच स्पष्ट होत असून, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.