अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता मिटकरी यांनी दिली आहे.
कधी घडली घटना
राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्याया विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकड राहिली,माझ्या मनाची होतीया काहीली ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केल्यावर काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला,तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृती स्थिर भेटायला येऊ नका
दरम्यान अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे,स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते व मित्रांना केली आहे
शिवव्याख्याते म्हणून ओळख
अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील. अकोल्याच्या अमरावती सीमेवर असलेल्या कुटासा हे त्यांचे गाव. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती आणि किराणा दुकान होते. मात्र, त्यांच्या वडिलांना समाजसेवेची आवड होती. त्यांच्या कुटुंबावर गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचंड प्रभाव होता. समाजसेवेचा हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. मिटकरींना लहानपणापासून भज किर्तन यात रस होता. गावागावात ते भजन-किर्तनातून संतांचे विचार पोहोचवत असत. त्यातूनच वक्ता म्हणून त्यांची जडणघडण झाली. जसजस कळू लागलं तसतसं त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सर्व संत, संविधान यांचा अभ्यास सुरू केला आणि या महापुरुषांचे विचार ते व्याख्यानातून मांडू लागले. शिवव्याख्याते म्हणून त्यांचा लौकिकही वाढला.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक
मिटकरी यांना आपली वक्तृत्वशैली अजितदादांना दाखवायची होती. पण संधी मिळत नव्हती. अखेर ती संधीही आली. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तीने ही संधी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली. शिवनेरीवरुन सुरु झालेल्या यात्रेवेळी अमोल मिटकरीचं नाव कुणालाही माहित नव्हतं..पण या यात्रेची सांगता झाली तेव्हा मिटकरी यांच्या भाषणांची मागणी राष्ट्रवादीचेच उमेदवार करत होते. वाशिममध्ये यात्रा आली असताना अवघ्या १० मिनिटे भाषण करायची संधी मिळाली आणि त्याचं सोनं करत मिटकरी यांनी मोठा पल्ला गाठला. आतापर्यंत व्याख्यान देऊन कुटुंब चालवणारे मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानपरिषदेवर घेतलं.