मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स बजावले आहे. सोमवारी ५ जुलैरोजी सकाळी ११ वाजता देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे ईडीने देशमुख यांना बजावले आहे.
अनिल देशमुख या आधी दोन समन्म मिळूनही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नव्हते. माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही, असे देशमुख यांनी ईडीला कळवले होते. इतकेच नाही, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी चौकशीसाठी तयार आहे, असेही देशमुख यांनी ईडीला कळवले होते.
ईडीने देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. तर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दरम्यान अनिल देखमुख हे आता कार्टाच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. कोर्टाकडून आपल्याला नक्की दिलासा मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र, देशमुख यांनी ईडीला दिलेली हजर न होण्याची कारणे ईडीने बाजूला सारत तिसरे समन्स बजावले आहे.
आपण सर्वप्रकारच्या चौकशीसाठी तयारच आहोत, परंतु आधी आपल्याला दस्तावेज देण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून केली होती. देशमुख यांनी ईडीकडे या प्रकरणाच्या ईसीआयआरची प्रत देखील मागितली आहे. १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी नेमकी कशाप्रकारच्या तक्रारीचा अहवाल तयार करण्यात आला याची सविस्तर माहिती या ईसीआयआरमध्ये असते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचीही ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. पुढे ईडीने देशमुख यांच्यासह त्यांच्या संबंधितांच्या घरावर छापेही टाकले.