Advertisement

राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाचे निकष जाहीर 

प्रजापत्र | Friday, 02/07/2021
बातमी शेअर करा

 

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच्या निकालाचे निकष काय असतील, याबाबत स्पष्टता नव्हती. आता राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रावर आधारित असणार आहे.  राज्य शिक्षण मंडळाने बारावी निकालाचे निकष सीबीएसई मंडळाप्रमाणे ३०:३०:४० या सूत्रावर आधारित असतील, असे म्हटले आहे.

 

 प्रत्येक महाविद्यालयाकडून निकलासाठी  निकाल समिती स्थापन करण्यात येणार असून, निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मूल्यमापनाचा तपशीलइयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ३० टक्के, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ३० टक्के, इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण ४० टक्के असे निकष ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाकडून निकलासाठी मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्यासह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. 

 

निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय पुनर्परिक्षार्थी म्हणून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ५० टक्के आणि बारावीतील सर्व चाचण्या, गृहप्रकल्प, तत्सम अंतर्गत मूल्यमापनाचे ५० टक्के गुण समाविष्ट असतील. तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन , दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 
 

Advertisement

Advertisement