सिरसाळा-राखेची वाहतूक करणारे पकडलेले टिप्पर सोडवण्यासाठी सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचार्यांवर बुधवारी (दि.२३) कारवाई करण्यात आली.मागील काही दिवसांपासून लाचखोरांचे प्रमाण जिल्ह्यात वाढले असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गजानन येरडलवार व उमेश कन्कावर यांनी एका एजंटच्या मार्फत तक्रारदाराकडे राखेचे टिप्पर सोडवण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी उस्मानाबाद एसीबीने सापळा रचत कारवाई केली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.