Advertisement

आत्मक्लेशानंतरही अजित पवार तसेच बोलण्या वागण्यात हवा काकांचा आदर्श

प्रजापत्र | Saturday, 19/06/2021
बातमी शेअर करा

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे धडाडीचे नेते,प्रशासनावर त्यांची मोठी पकड, त्यामुळे अजित पवार काही बोलायला लागले की भल्याभल्या अधिकार्‍यांची पाचावर धारण बसते, मात्र अधिकारी आपल्याला घाबरतात म्हणून आता अजित पवारांची भाषा अधिकाधिक कडक होत आहे. यापूर्वी एकदा ‘धरणात मुतण्याच्या’ वक्तव्यानंतर अजित पवारांनी ‘आत्मक्लेश’ आंदोलन देखील केले होते. मात्र या आत्मक्लेशानंतर देखील त्यांच्यातील सत्तेचा अहंकार गेलेला नसल्याचेच दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्याचा प्रत्यय येत असतानाच बीडच्या दौर्‍यात त्यांनी मुख्याधिकार्‍यांना वापरलेली एकेरी भाषा असेल, किंवा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांना बोलू न देण्याची भूमिका, अगदी कोविड योद्धयांवर झालेला लाठीमार, अजित पवार सत्तेच्या हवेत असले की हे प्रकार ठळकपणे समोर येतात, सत्ता कशी राबवायची असते आणि वागणे बोलणे कसे हवे याबाबतीत अजित पवारांनी इतर कोठे न जात स्वतःचे काका शरद पवारांचा आदर्श घेण्याची गरज आहे.

 

 

‘पावर करप्टस अँड अबसुल्यूट पावर करप्टस अबसुल्युटली’ असे एक इंग्रजी विधान आहे. हे एक सार्वकालिक सत्य आहे. यातील करप्टस म्हणजे भ्रष्टपणा म्हणजे केवळ आर्थिक बाबतीत नसतो, तर वागण्या बोलण्याच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होते. सत्तेच्या वर्तुळात वावरताना जेव्हा जबाबदारीचे पद येते त्यावेळी तोंड सोडून बोलणे अशा व्यक्तींकडून अपेक्षित नसते. तोंड सोडून बोलण्याच्या सवयीमुळे चार लोक टाळ्या वाजवीतील, किंवा काही लोक घाबरतील मात्र हा आदर्श प्रशासकाचा गुण नक्कीच नाही. याचीच जाणीव अजित पवारांना करून देण्याची आवश्यकता आहे.
अजित पवार आणि फटकळ वक्तव्ये नवीन नाहीत. बीडच्या दौर्‍यात अजित पवारांनी बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना झापले. अधिकारी चुकत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण म्हणून उपमुख्यमंत्री  पदावरील व्यक्तीने एखाद्या अधिकार्‍याला भर बैठकीत एकेरी बोलणे संसदीय संकेतात बसत नाही.याच बैठकीत अजित पवारांच्या एकंदर वर्तणुकीने बीड जिल्ह्यातील सारेच प्रशासन अस्वस्थ झाले आहे. बीडच्या आढावा बैठकीत बीडची माहिती जिल्हाधिकार्‍यांकडून घेण्याऐवजी पवारांनी ती विभागीय आयुक्तांकडून घेतली. आणि त्याचवेळी कोरोना नियंत्रणात तुमचे काम अपुरे आहे असे ताशेरे देखील जिल्ह्यातील अधिकार्‍यांवर मारले. जिथे जिल्हाधिकार्‍यांना बोलू दिले जात नाही तेथे आपले काय, आणि मग याच साठी आम्ही रात्रीचा दिवस केला होता का ? असा सवाल आता अधिकारी खाजगीत करीत आहेत. उद्या अशा अनेक अधिकार्‍यांनी एकाचवेळी बदल्या मागितल्या तर तो अजित पवारांच्या फटकळ प्रशासनाचाच परिपाक असेल. त्यानंतरही ज्यावेळी कोविड योद्धे निवेदन द्यायला आले, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार झाला आणि अजित पवार हे पाहात राहिले. सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर काय होते याचा हा परिपाक .

अर्थात अजित पवारांचा हा फटकळपणा राज्याला नवीन नाही. यापूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याला ‘तुम्ही छा छू कामे करता’ असे पवार जाहीरपणे बोलले होते. काही वर्षांपूर्वी ‘धरणात मुतण्याच्या’ प्रकरणानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी जाऊन ‘आत्मक्लेश’ आंदोलन देखील केले होते, मात्र यानंतरही त्यांच्या वागण्या बोलण्यात बदल झाले नाहीत. राज्याच्या राजकारणात ‘तोलुनी बोलावे ’ हा शरद पवारांचा शिरस्ता. कठोरातील कठोर टीका संसदीय शब्दात करावी ती शरद पवारांनीच. त्यामुळे आता अजित पवारांनी वागण्या बोलण्याच्या बाबतीत त्यांचा तरी आदर्श घ्यावा असे अपेक्षित आहे. बाकी अजित पवारांना ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ असे सांगण्याची हिंमत राष्ट्रवादीत तर दुसरे कोणी दाखविणार नाही.

Advertisement

Advertisement