कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशासेविका तसंच अंगणावाडी सेविकांना हाक दिली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असून यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा सेविकांसोबत संवाद साधला. यावेळी तज्ञ डॉक्टरही उपस्थित होते. यावेळी त्यांनी आशासेविकांना त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असं आश्वासन देत त्यांच्या कार्याबद्दल मानाचा मुजराही केला.
“अजूनही करोना संकट गेलेलं नाही. संकट टळलेलं नसलं तरी ते नियंत्रणात आणू शकतो असं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात जे काम आपण करत आहोत त्याची आश्चर्यकारकरित्या देशात आणि परदेशात प्रशंसा होत आहे. कौतुक होत असताना महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री यांचं कौतुक होतं. पण मी काहीच केलेलं नाही मी फक्त निमित्तमात्र असून कर्ते करवते तुम्ही आहात,” असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आशा शब्दाला साजेसं काम आपण करत आहात असं कौतुक केलं.
सरकार येण्याआधी आशा आणि अंगणवाडी सेविकांना काढलेल्या मोर्चाची आठवण करुन देत उद्धव ठाकरेंनी यावेळी मदतीचं आश्वासन दिलं. “सरकारच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर बळीराजाकडे आधी लक्ष दिलं. तुमच्या आशा, अपेक्षांकडे लक्ष देणार तितक्यात कोविड संकट आलं. पण तुम्हाला विसरलो आहोत असं समजू नका. आपले ऋण विसणार नाही. परतफेड करणं शक्य नसलं तरी तुमच्या वेदनांची दखल घेतली आहे. त्यावर मी नक्कीच मार्ग काढणार असून त्यासाठी थोडा अवधी लागेल. सरकारला थोडी मुभा द्या,” अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली.
“दुसरी लाट आल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना आहे. तिथं तुमचं काम अधिक आहे. आतापर्यंतही तुम्ही खूप काम केलं आहे. घरोघरी जाऊन पाहणी, तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला कुटुंब म्हणून तळाहाताच्या फोडासारखं जपलं आहे. तेच हात तिसरी लाट थोपवताना हवी आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“दुसरी लाट ओळखायला उशीर केला आणि संकट आलं. आताही आपण निर्बंध उठवत असून त्याच्यासाठी काही निकष ठरले होते. मात्र तुमच्यावरील ओझं कमी झालेलं नाही. आता पावसाळ्यात कोविड आणि नॉन कोविड ओळखणं कठीण झालं आहे. येत्या दोन तीन दिवसांत मुंबई आणि जवळील परिसरात मुसळधार पावासाची शक्यता असून आव्हानं समोर येणार आहेत. त्यांना न डगमडता करोना संकट थोपवायचं आहे. तिसरी लाट येऊ द्यायची नाही,” असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.आशा आणि अंगणवाडी सेविका आपल्या प्रशासनाचा पाठकणा आहेत. त्यांनी काम करावं म्हणून कौतुक करत नाही सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना मानाचा मुजरा केला.