मुंबई दि.४ - सध्या कोरोनाची चाचणी दोन पध्दतीने केली जाते. एक म्हणजे RT-PCR TEST आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट Rapid antigen test. या दोन्ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केल्या जातात .पण या चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या भल्यामोठ्या रांगा अन् त्याचे रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ या त्रासातून आता मुक्तता होणार आहे. कारण आता घरच्या घरी स्वत:ची कोरोनाची चाचणी अवघ्या २५० रुपयांत करता येणार आहे. तुमच्या जवळच्या मेडिकल दुकानात किंवा ऑनलाईनही तुम्हाला हे टेस्ट किट उपलब्ध होईल. COVISELF असे या किटचे नाव असून पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट तयार केली आहे.
काही दिवसापूर्वीच ICMR ने घरबसल्या लोकांना स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला मंजुरी दिली होती. या टेस्ट किटचे कर्मिशअल लाँचिंग झाले आहे. म्हणजे ही टेस्ट आता बाजारात मिळणार आहे. मेडिकल शॉपमध्ये किंवा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरसुद्धा ही टेस्ट किट खरेदी करता येईल. या टेस्टमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानले जाईल. त्यानंतर दुसरी कोणतीही टेस्ट करावी लागणार नाही, असे ICMR ने सांगितल आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
दरम्यान ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना RT-PCR टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानल जाईल. RT-PCR टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. ही होम टेस्टिंग किट फक्त अशा लक्षण दिसणा-या रुग्णांसाठी आहे. जे लॅब टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. अवघ्या १५ मिनिटांत तुमचा कोरोना टेस्ट रिपोर्ट तुम्हाला प्राप्त होणार आहे.