महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम
घाटनांदूर-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिक्षण प्रक्रिया ठप्प असल्याने शासनासह प्रशासनाने ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय समोर ठेवले आहेत. यावर सोमेश्वर शैक्षणिक संकुलाने व एससीएन चॅनलने नामी युक्ती शोधून काढत लाईव्ह ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरु केला आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळत असून महाराष्ट्रातील पहिल्या या अभिनव उपक्रमाची जिल्हाभर चर्चा सध्या सुरु आहे.

सोमेश्वर परिवारात उभा केलेल्या स्टुडिओतुन सोमेश्वर विद्यालय व कन्या प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका यांच्याकडून एससीएन या चॅनेलवर दर्जेदार, उत्तम व उत्कृष्ट ऑनलाईन शिक्षणाचे थेट प्रक्षेपण सुरु आहे. ज्या गावांत हे चॅनल नाही तिथे विद्यार्थ्यांसाठी मोबाईलवर लाईव्ह शिक्षणाची लिंक पाठवली जाते. ऑनलाईन शिक्षणासाठी डी.डी.सह्याद्रीवरील टिलीमिलीनंतर सोमेश्वर परिवार, घाटनांदूरद्वारे  लाईव्ह टेलिकास्ट होणारा बहुतेक हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. एससीएनचे संचालक गोविंद कराड हे वारकरी सांप्रदायातील सेवाभावी वृत्तीचे व्यक्तिमत्व असुन विद्यार्थ्यांपर्यंत केबल व युट्युब लिंकद्वारे मोफत ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम पोहचवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक व शैक्षणिक जाणीवेतुन एससीएन व सोमेश्वर परिवाराने मोफत ऑनलाईन शिक्षणाच्या स्तुत्य व प्रशंसनीय कार्याचे सर्वस्तरातुन कौतुक करण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थी एससीएन व युट्युबवरील तास कोणी कोणी पाहिला याची माहिती व्हाटसअँपवर पोस्ट करत आहेत. दररोज एक तास केबलवर तर दोन तास मीट अँपवर क्लास होत आहेत. लाईव्ह ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घाटनांदूर परिसरातील 35 गावांसह पाच तालुक्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थी घेत आहेत. सोमेश्वर परिवाराने ऑनलाईन शिक्षणाच्या नवप्रकल्पाचे आणि शिक्षकांच्या शैक्षणिक बांधिलकीचे शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
                                    
                                
                                
                              
