परळी-परळी येथे रविवारी किराणा दुकान उघडली म्हणून तहसील प्रशासनाने एका व्यापाऱ्याला शिवभोजन थाळी देऊन गांधीगिरी केल्याचा दावा केला आहे. मात्र व्यापाऱ्यांची अशी थट्टा करणे हा अपमानाचा प्रकार आहे.
रविवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात, अगदी जिल्हा मुख्यालय असलेल्या बीड शहरात देखील किराणा आणि इतर दुकाने सुरु होती. मात्र परळीत तहसील प्रशासनाने वेगळे नियम वापरले. एका व्यापाऱ्याने किराणा दुकान उघडली म्हणून त्यांना प्रशासनाने चक्क शिवभोजन थाळी दिली. आम्ही हे गांधीगिरी म्हणून केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.तर कायदे राबविणाऱ्या प्रशासनाने व्यापाऱ्यांची असली थट्टा करणे योग्य नसल्याच्या भावना व्यापारी खाजगीत व्यक्त करीत आहेत .
एका थाळीने कोणाकोणाचे पोट भरणार ?
व्यापाऱ्याला शिवभोजन थाळी देऊन जर प्रशासन 'आम्ही तुमच्या जेवणाची सोय करतो , पण दुकान उघडू नका' असे दाखविणार असेल तर ही कोणत्याही व्यक्तीच्या स्वाभिमानासोबत केलेली थट्टा आहे. एका दुकानावर केवळ एका व्यक्तीचे पोट नसते, त्या व्यापाऱ्याचे कुटुंब, तेथील कामगारांची कुटुंबे अशी किती तरी कुटुंबे त्यावर अवलंबून असतात. अशावेळी प्रशासनाची एक शिवभोजन थाळी कोणाकोणाचे पोट भरणार आहे? एका दुकानावर किमान २५-३० लोकांची रोजी रोटी असते, प्रशासन कोणाकोणाला शिवभोजन पुरविणार आहे ? असली थट्टा करून प्रशासन काय साधत आहे हाच प्रश्न आहे.