केज दि.३० - पहिलीच मुलगी झाली आणि दुचाकी घेण्यासाठी माहेरहुन ३० हजार रुपये घेऊन येण्याच्या जाचास कंटाळून एका २१ वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनसारोळा येथे घडली. याप्रकरणी पती, सासू, सासरा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बनसारोळा येथील मयत सुनीता दिनकर गोरमाळी ( वय २१ ) या महिलेचा दिनकर गोरमाळी याच्यासोबत १० फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. त्यांनतर तुला पहिलीच मुलगी झाली व माहेरहून दुचाकी घेण्यासाठी ३० हजार रुपये घेऊन ये असे म्हणत सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
या छळास कंटाळून सुनीता हिने २९ मार्च रोजी सकाळी दहा वाजता गावातील कुंडलिक शंकर गोरे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुनीताचे वडील पांडुरंग कचरू दुधाळ ( रा. हिवरसिंगा ता. शिरूर कासार ) यांच्या फिर्यादीवरून पती दिनकर गोरमाळी, सासू मंदोदरी गोरमाळी, सासरा सावत गोरमाळी यांच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.