परळी । दिनांक ११ वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आजपासून पुन्हा सुरळीत चालू झाला आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करू, यात कसलाही अडथळा आता येऊ देणार नाहीत असा शब्द देत कर्मचारी युनियनने कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्यावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
यासंदर्भात वैद्यनाथ कारखाना कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विष्णू तांबडे व उपाध्यक्ष बालासाहेब मुंडे यांनी कारखाना प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,आम्ही, सर्व वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन हे स्पष्ट करू इच्छितो की, आमची कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ॲडव्हान्स बद्दल कारखान्याच्या मॅनेजमेन्टशी चर्चा चालू होती. ही चर्चा सकारात्मक वळण घेत असतांना कांही लोकांनी यामध्ये हस्तक्षेप व मुजोरी करून कारखाना बंद पाडला आणि यामुळे बाहेर मिडियामध्ये बातमी पसरली. कांही चॅनलने १९ महिन्याचे पगार रखडले अशी बातमी दिली. परंतू कारखाना सुरू होऊन चारच महिने झालेले आहेत, आणि मागील वर्षी कारखाना ऊसा अभावी बंद होता.आमची मॅनेजमेन्टशी चर्चा संपूर्ण होऊन आम्हाला हवी असलेली मागणी मान्य झालेली आहे. तरी कारखाना हा आमचा परिवार असून कारखान्याची नाहक बदनामी झाली याबद्दल खंत व्यक्त करतो. आता आम्ही कारखाना सुरळीत सुरू करून चालवू आणि शेतकऱ्यांचे हाल होऊ देणार नाहीत याची जबाबदारी मॅनेजमेन्ट सोबतच आमची देखील आहे असे नमुद केले आहे.