Advertisement

उमरग्यात खंडणीसाठी गुन्हेगारी कट; तीन ठिकाणी मध्यरात्री दहशत!

प्रजापत्र | Sunday, 29/11/2026
बातमी शेअर करा

 उमरगा दि.२९(प्रतिनिधी) : खंडणीच्या मागणीसाठी गुन्हेगारी कट रचून,गैरकायदेशीर जमाव जमवत दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार उमरगा शहरात उघडकीस आला आहे. एका टोळक्याने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीच्या कामासाठी लावण्यात आलेल्या तब्बल १४ वाहनांची लाकडी दांडे,हॉकी स्टिक,बॅट आणि लोखंडी रॉडने तोडफोड केली.या घटनेत अंदाजे ५ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, खंडणी मागणे, दरोडा टाकणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्यासह विविध गंभीर कलमांन्वये आठ जणांसह  दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील आयआयटी मेन गेट,पवई परिसरातील रहिवासी गोरक्ष दामोदर शिरसाट (वय ४९) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बुधवार (दि.२५) रोजी रात्री ११.२० ते ११.५० वाजण्याच्या दरम्यान उमरगा शहरातील एचडीएफसी बँक (ऐश्वर्या हाईट्स समोर),साईधाम येथील पंचवटी बिल्डिंग आणि चौरस्ता परिसरातील हॉटेल ब्ल्यू डायमंड अशा तीन ठिकाणी हा प्रकार घडला.संशयित आरोपींनी संगनमत करून गुन्हेगारी कट रचला. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. तसेच दहशत निर्माण करून कंपनीच्या कामासाठी लावलेल्या १४ वाहनांवर लाकडी दांडे, हॉकी स्टिक, क्रिकेट बॅट व लोखंडी रॉडने हल्ला चढवून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या हल्ल्यात वाहनांचे अंदाजे ५ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये गणी रज्जाक शेख, विकास भीम पवार, आकाश नवाडे, चैतन्य सूर्यवंशी, सुशील शाहापुरे, विकास जाधव, व्यंकट अण्णा धोत्रे, आकाश धोत्रे आणि अन्य दोन अनोळखी इसमांचा समावेश आहे.आनंदनगर पोलीस ठाण्यात एनसीआरची नोंद करण्यात आली होती.त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने उमरगा पोलीस ठाण्यात वर्ग झालेल्या या प्रकरणात शनिवार (दि.२८)रोजी   भारतीय न्याय संहितेच्या कलम ६२(२), १८९(२), १९१(२), १९१(३), ३२४(५), ३१०(२), ३५१(२) आणि ३०८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिवचे पोलीस अधीक्षक,उमरग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक श्री.सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हेरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.शहरात खंडणीसाठी टोळक्यांकडून अशा प्रकारे वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Advertisement

Advertisement