Advertisement

दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे;दिरंगाई खपवून घेणार नाही!

प्रजापत्र | Saturday, 28/11/2026
बातमी शेअर करा

धाराशिव : तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतली. दुष्काळाचे संकट अधिक तीव्र होण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस उपाययोजना हाती घेऊन युद्धपातळीवर कामाला लागावे. दुष्काळ निवारणाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

या बैठकीत धाराशिव तालुक्यातील सर्व गावांमधील नळपाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली आणि अपूर्ण कामे, चारा लागवड, पाणीटंचाई निवारण तसेच आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाने केवळ कागदोपत्री आढावे आणि प्रस्तावांमध्ये वेळ घालवू नये. पाणी आणि चाऱ्याअभावी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच नियोजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश कैलास पाटील यांनी दिले.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ज्या गावांमध्ये नवीन पाइपलाइन, विहीर, बोअर किंवा अन्य पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, अशा गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच पाइपलाइनची कामे टीपीडब्ल्यूएसमधून करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, गावठाणातील विहिरींचे खोलीकरण व दुरुस्ती, गावांतर्गत पाइपलाइनची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी गावठाण फिडरवरून सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, महावितरण, जलजीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, प्रशासक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

चारा लागवड आणि जनावरांच्या टॅगिंगला प्राधान्य

ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीमार्फत सादर करण्यात आलेले चारा लागवडीचे प्रस्ताव आवश्यक त्रुटींची पूर्तता करूनही प्रलंबित असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे प्रस्ताव तातडीने निकाली काढून चारा लागवडीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच तालुक्यातील सर्व जनावरांचे पुढील आठ दिवसांत १०० टक्के विनामूल्य टॅगिंग पूर्ण करावे. चारा वितरणाच्या वेळी पशुपालकांना कोणत्याही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्यास सांगितले.कृषी वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी तालुक्यातील सर्व एजी फिडरवर १०० टक्के एचडीटी बसविण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करून संबंधित विभागाकडे पाठवावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाची तसेच सार्वजनिक स्वरूपाची कामे तातडीने हाती घेऊन पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. गावागावांत मजुरांना सार्वजनिक कामे उपलब्ध करून रोजगाराचा प्रश्नही मार्गी लावावा, असे त्यांनी सांगितले.ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे, तेथे आवश्यकतेनुसार नवीन पाण्याचे स्रोत उपलब्ध करून द्यावेत. गरज भासल्यास बोअर अधिग्रहणाची कार्यवाहीही तातडीने करावी, असे निर्देश देण्यात आले. टंचाई निवारणाच्या कामांमध्ये प्रशासकीय पदांवरील जबाबदारीमुळे अडथळे निर्माण होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासक पदावरून कार्यमुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तातडीने सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा

दुष्काळाचे संकट केवळ शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून शेतमजूर, पशुपालक, महिला आणि ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाणी, चारा आणि रोजगार या तिन्ही आघाड्यांवर प्रशासनाने सज्ज राहणे आवश्यक आहे. संकट आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संकट येण्यापूर्वीच त्याचा मुकाबला करण्याची तयारी ठेवावी, असे कैलास पाटील यांनी सांगितले.प्रत्येक कामाची कालमर्यादा निश्चित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. प्रस्ताव प्रलंबित ठेवून नागरिकांना पाण्यापासून आणि पशुधनाला चाऱ्यापासून वंचित ठेवण्याची कोणतीही सबब चालणार नाही. अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकण्याऐवजी ती स्वीकारावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुष्काळग्रस्त जनतेला त्रास सहन करावा लागल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

Advertisement

Advertisement