पुणे महापालिकेने सुरु केलेल्या 'भाऊ फ्लेक्स काढा ' अभियानाची सध्या जोरात चर्चा आहे . पुणे महापालिकेने याच अभियानाचा भाग म्हणून 'विद्रुपीकरण ' पुरस्कार जाहीर करणे देखील सुरु केले आहे. मनमानीपणे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावायच्या आणि सारे शहर विद्रुप करायचे हा प्रकार सध्या राज्यभर आहे. बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यात देखील सारे शहर फ्लेक्सच्या गर्दीत हरवते का काय असे वाटावे अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होत असते . अगदी पुढार्यांनी आपले बॅनर लावू नका असे आवाहन केले तरी कार्यकर्ते बॅनर, फ्लेक्स लावायचा उत्साह आणि 'ऊर्जा ' कोठून आणतात हे न न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे आता 'भाऊ फ्लेक्स काढा ' चा पुणे पॅटर्न बीड जिल्ह्यासह राज्यभर राबविला जायला हवा.
पुणे शहर हे एकेकाळी राज्यात दिशा देणारे म्हणून ओळखले जायचे. आता गुन्हेगारीच्या काही घटना सोडल्या तर अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात पुन्हा पुण्याहून होताना दिसत आहे. उत्सवांच्या नावावर होणार डीजेचा थयथयाट थांबला पाहिजे हा सूर लावण्याचे धारिष्ट्य पुण्यातूनच दाखविले गेल्यानंतर आता पुणे महापालिकेने सुरु केलेले 'भाऊ फ्लेक्स काढा' अभियान सध्या ट्रेंडिंग होतेय आणि याला पुणे शहरातून भरभरून प्रतिसाद देखील मिळतोय. ही मोहीम सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तब्बल ७६४ नागरिकांनी शहरातील अनधिकृत फ्लेक्सचे फोटो या वेबसाईटवर अपलोड करून तक्रारी नोंदवल्या आहेत, तर पुणे महापालिकेने अगदी महापौर मंजुषा नागपुरे यांचे बॅनर देखील संकेत स्थळावर टाकून त्याचे जाहीर प्रदर्शन केले. आजच्या काळात सत्ताधाऱ्यांच्या पुढे शांत बसण्याची मानसिकता प्रशासनात वाढत असताना महापालिकेतील अधिकाऱ्यांचे हे धारिष्ट्य म्हणूनच कौतुकास्पद. महापालिकेचे आयुक्त असलेल्या नवलकिशॊर राम यांच्यासारख्या अधिकाऱ्याने भूमिका घेत हा ताठ कणा दाखविला हे अभिनंदनीय. म्हणूनच आता तो पॅटर्न राज्यातही व्हायला हवा.
आज राज्यात काय किंवा बीडसारख्या अनेकदा दुसकळै असलेल्या जिल्ह्यात काय , सर्वच प्रमुख शहरे अनेकदा बॅनर, फ्लेक्सने वेढलेली असतातच. कोणाचाही वाढदिवस असेल किंवा कोणतेही उदघाटन, त्याचा पहिला फटका बसतो तो शहरातील रस्त्यांना. शहरातील सर्व रस्ते, चौक म्हणजे जणूकाही आपल्या बारबाजीसाठीच आहेत अशा थाटात मोठं मोठे बॅनर, होर्डिंग्जस सर्रास लावल्या जातात. यासंदर्भात कोणी बोलायचं प्रयत्न केला तरी त्याच्या आवाजाकडे लक्ष्यच द्यायचे नाही हे पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जणू ठरवून टाकलेले असते. प्रत्येक महिन्याला पोलिसांकडून अवैध बॅनरवर केलेली कारवाई याचा अहवाल जातो, मात्र त्यातली माहिती निरंकाच असते. शहरातील नागरिकांना, रस्त्यावरून चालणारांना या बारबाजीचा कितीही उबग आला तरी ते लोक बिचारे काय करणार ? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणविणाऱ्या यंत्रणाच याकडे डोळेझाक करणार असतील तर गाऱ्हाणे मांडायचे कोणाकडे? मग गप गुमान शहराचे होणारे विद्रुपीकरण पाहत राहायचे. यात अपघाताचं धोका असला म्हणून काय झाले , आणि काही किरकोळ अपघात झालेच तर ते बॅनरबाज प्रसिद्धीपेक्षा मोठे थोडीच असणार अशीच भूमिका सर्वांची. त्यात पुन्हा कोणी बोलू गेल्यास लगेच सर्वांचा राजकीय, सामाजिक अभिनिवेश जागा होणार , हे सारे नेमके आताच का ? त्यांच्या वाढदिवसाला चालले, आताच का नाही, अमुक जयंतीला बॅनर लागले मग यावेळीच का असले तर्कट मांडायला लोक तयार . बरे अनेकदा पुढारी जाहीर करणार , आमच्या वाढदिवसाला बॅनरबाजी नको, मात्र तसे झाले तरी कार्यकर्त्यांचे बॅनर लागणारच. पुढाऱ्यांवरचे हे इतके प्रेम नेमके आपण त्या नेत्याच्या नजरेत भरावे यासाठीच का यामागची ऊर्जा आणि या बॅनरबाजीचा 'अर्थ ' आणखी वेगळा हे त्या लोकांनाच माहित, मात्र या बॅनरबाजीचा सामान्यांना वैताग येतो हे खरेच.
म्हणूनच 'भाऊ फ्लेक्स काढा' ची आवश्यकता आजघडीला राज्यभर आहे. बीडमध्ये याची सुरवात यासाठी व्हायला हवी की ज्या सुनेत्रा पवार पुण्याचे पालकत्व करत आहेत, त्याच बीडचे देखील पालकत्व करतात . त्यामुळे त्यांनी जो मोकळा हात प्रशासनाला पुण्यात दिला, तो बीडमध्ये देखील द्यायला हवा. बाकी सध्या पुण्यात आयुक्त असलेले नवलकिशोर राम बीडला जिल्हाधिकारी होतेच , त्यांच्या कामाचे बीडकरांना कायम कौतुक राहिलेले आहेच, त्यामुळे बीड जिल्ह्यात आणि इतरही भागात 'भाऊ फ्लेक्स काढा ' चा पॅटर्न स्वीकारला जायला काहीच हरकत नाही.

