बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने आता (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयातून मोठी माहिती समोर आली असून यासंदर्भात दाखल याचिकांवरील अंतिम सुनावणी १६ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी (State Government) राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यादिवशीच (Beed) बीडसह राज्यातील प्रलम्बित १२ जिल्हापरिषद निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे.
राज्यातील प्रलंबित जिल्हापरिषद (Zilla parishad)आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी सुरु असून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी (दि, २९ ) झालेल्या सुनावणीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झाले आहेत. त्यातून आता जिल्हापरिषद निवडणुकांसंदर्भातील परिस्थिती स्पष्ट झाली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाला जिल्हापरिषद निवडणुकांच्या संदर्भाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, त्याच्या अंमलबजावणीचे काय झाले असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. त्यासोबतच इतर जिल्हापरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांप्रमाणेच प्रलंबित जिल्हापरिषद निवडणुका देखील घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून या निर्देशांच्या पूर्ततेसाठीचे शपथपत्र दाखल करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. आता या प्रकरणात १६ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील बीडसह प्रलंबित १२ जिल्हापरिषद निवडणुका केव्हा होणार हे आता १६ डिसेंबरला स्पष्ट होईल.

प्रजापत्र | Friday, 27/11/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
