Advertisement

 पीक विम्यासाठी मुदतवाढ

प्रजापत्र | Saturday, 01/08/2026
बातमी शेअर करा

पुणे : राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यात अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पीकविमा अर्जासाठी असलेली ३१ जुलैची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. दरम्यान, ३१ जुलैअखेर राज्यभरातून ५३ लाख ७४ हजार ३९ विमा अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या खरिपात राज्यात एकूण ९३ लाख ८० हजार ७३४ विमा अर्ज आले होते. त्याच्या तुलनेत आतापर्यंत ५७.२९ टक्के अर्ज आले आहेत. 

    गेल्या दोन दिवसांत अर्ज नोंदणीला वेग आला. २९ जुलैअखेर अर्जांची संख्या ४१.६८ लाख, तर ३० जुलैअखेर ४७.४५ लाख होती. ३१ जुलै रोजी हा आकडा ५३.७४ लाखांवर पोहोचला. त्यामुळे २९ ते ३० जुलैदरम्यान सुमारे ५.७७ लाख, तर ३० ते ३१ जुलैदरम्यान ६ लाख २९ हजार ३९ अर्जांची वाढ झाली.

 

मराठवाड्यातील जिल्हे आघाडीवर

पीकविमा अर्जांच्या संख्येत मराठवाड्यातील जिल्ह्यांचे वर्चस्व दिसून आले आहे. नांदेडनंतर बीड जिल्ह्यातून ६ लाख १० हजार ४६२, परभणीतून ४ लाख ११ हजार २०७, लातूरमधून ३ लाख ९५ हजार १३०, तर धाराशिव जिल्ह्यातून ३ लाख १३ हजार ४७२ अर्ज आले आहेत. राज्यातील एकूण अर्जांपैकी नांदेड जिल्ह्याचा वाटा १५.७९ टक्के, बीडचा ११.३६ टक्के, परभणीचा ७.६५ टक्के, लातूरचा ७.३५ टक्के, तर धाराशिवचा ५.८३ टक्के आहे. या पहिल्या पाच जिल्ह्यांतून एकूण २५ लाख ७८ हजार ६२७ अर्ज आले आहेत. म्हणजेच राज्यातील जवळपास ४८ टक्के विमा अर्ज या पाच जिल्ह्यांमध्येच दाखल झाले आहेत.

 

२६ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

राज्यात दाखल झालेल्या ५३ लाख ७४ हजार ३९ अर्जांपैकी ५० लाख २६ हजार ६८५ अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. कर्जदार शेतकऱ्यांकडून ३ लाख ४७ हजार ३५४ अर्ज आले आहेत. एका शेतकऱ्याने एकापेक्षा अधिक पिकांसाठी किंवा क्षेत्रासाठी अर्ज केले आहे. त्यामुळे २६ लाख ५१ हजार ७८९ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.

३४.४९ लाख हेक्टर क्षेत्राला संरक्षण

राज्यात आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांद्वारे ३४ लाख ४९ हजार ४०६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या क्षेत्रावरील पिकांची एकूण विमा संरक्षित रक्कम २० हजार १३३ कोटी ५० लाख रुपये आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी ३५१ कोटी ४२ लाख रुपये जमा केले आहेत. राज्य सरकारचे २६२ कोटी ६३ लाख आणि केंद्र सरकारचे २६२ कोटी ६३ लाख रुपये अनुदान विचारात घेता एकूण विमा हप्त्याची रक्कम ८७६ कोटी ६८ लाख रुपये झाली आहे. 

Advertisement

Advertisement