Advertisement

राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर

प्रजापत्र | Thursday, 17/09/2026
बातमी शेअर करा

मुंबई : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने राज्यातील खरिपाची पिके संकटात सापडली असून अनेक जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. बैठकीत मदतीबाबतचा निर्णय झाला नसला, तरी यंत्रणेने सतर्क राहावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले.  

 

एनडीआरएफ निकषांनुसार नुकसानीचे पंचनामे हे ५ ऑक्टोबरनंतर करावे लागतात. त्यापूर्वीचे पंचनामे हे मदतीस पात्र ठरत नाहीत. आताच पंचनामे करणे हे घाईचे होईल. तसे केले तर नुकसानीचा नेमका आकडा व त्यातून करावयाची मदत याबाबत स्पष्टता येऊ शकणार नाही. शेतकऱ्यांना मदतीसाठी करावयाच्या उपाययोजनांची यादी तयार केली जात आहे. यंत्रणेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.मराठवाडा : बीडमध्ये ३७.२१%, जालन्यात २७.८३ % तर छत्रपती संभाजीनगरमध्येही ७.०६% पेरणी क्षेत्र बाधित झाले आहे. लातूर, धाराशिव व परभणीमध्ये हलक्या जमिनीवरील सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस पिके सुकत आहेत. सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. 

 

पश्चिम महाराष्ट्र : सोलापूर, सातारा, सांगली आणि अहिल्यानगरच्या कोरडवाहू पट्ट्यात पावसाच्या खंडामुळे मूग, उडीद, सोयाबीन, मका आणि बाजरीला ताण बसला आहे. उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घटू शकते.

 

विभागनिहाय काय आहे पिकांची स्थिती? शेतकरी हवालदिल

विदर्भ : सोयाबीन आणि कापूस संकटात आहेत. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिममधील काही तालुक्यांत दोन ते तीन आठवड्यांचा खंड पडला आहे. हलक्या जमिनीवरील सोयाबीन कोमेजले असून सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी संरक्षक सिंचनाचा आधार घेतला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांत भात लागवडही पावसाअभावी लांबली आहे.

 

उत्तर महाराष्ट्र : नाशिकच्या काही तालुक्यांसह नंदुरबारमध्ये पावसाच्या खंडामुळे मका, कापूस आणि अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मात्र धुळे आणि जळगावच्या अनेक भागांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावात महिनाभराच्या खंडानंतर पाऊस झाल्याने खरीप पिकांना फायदा झाला; मात्र काही केळी बागांचे नुकसान झाले. 

 

कोकण : तुलनेने परिस्थिती चांगली. मात्र रत्नागिरीतील काही भाग व सिंधुदुर्गातील सावंतवाडी-वसई परिसरात पावसाची गरज निर्माण झाली आहे. भाताची वाढ समाधानकारक असली तरी काही भागांत नाचणीवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला.

 

 

 

Advertisement

Advertisement