छत्रपती संभाजीनगर: दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठवाड्यात मान्सूनचा मोठा 'मेगा स्पेल' सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये (३० जुलै ते ३१ जुलै २०२६ सकाळी ८ वाजेपर्यंत) छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत सर्वदूर समाधानकारक आणि दमदार 'भिज पाऊस' झाला आहे. ३१ जुलैच्या सकाळी ११ वाजेच्या विभागीय प्रशासकीय अहवालानुसार, मराठवाड्यात एकाच दिवसात सरासरी ६७.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोरड्या पडणाऱ्या पिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आकडेवारीप्रमाणे २३० हून अधिक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.
विभागीय आकडेवारीनुसार, हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल १०३.९ मि.मी. या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात ८८.६ मि.मी., परभणी जिल्ह्यात ८९.२ मि.मी. आणि जालन्यात ८४.० मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६०.३ मि.मी., बीडमध्ये ४३.९ मि.मी., लातूरमध्ये ४५.२ मि.मी. आणि धाराशिव जिल्ह्यात ३५.७ मि.मी. पाऊस झाला आहे.
सिल्लोड, सोयगाव, भोकरदन आणि किनवटमध्ये अतिवृष्टी
विभागातील २३० हून अधिक महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव (१४१.७५ मिमी), सिल्लोडमधील भराडी, आमठाणा, बोरगाव (प्रत्येकी १३७.२५ मिमी), जालन्यातील भोकरदन व हसनाबाद (१५५.५ मिमी), नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील मांडवा (२३९.७५ मिमी), उमरी बाजार (२५१.५ मिमी) व माहूर (२२३ मिमी) तसेच हिंगोलीच्या सिरसम (१७३.७५ मिमी) येथे तुफान पाऊस झाला आहे. हे देखील वाचा: कळमनुरी तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला मोठा पूर आला असून सोडेगाव व नांदापूरसह ६ गावांचा
संपर्क तुटला आहे.
वार्षिक सरासरीच्या ४७.८ टक्के पाऊस पूर्ण
जूनपासून ३१ जुलै २०२६ पर्यंतच्या प्रगतीपथावरील आकडेवारीनुसार मराठवाड्यात एकूण ३२५.१ मि.मी. (१०१.५%) पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत विभागामध्ये ४७.८ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५८.९% तर जालन्यात ६१.७% पाऊस झाला आहे.

