Advertisement

पंढरपूर १० किलोमीटरवर असतानाच आजीबाईंनी घेतला जगाचा निरोप

प्रजापत्र | Saturday, 25/07/2026
बातमी शेअर करा

 बीड : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १९४ मध्ये पंढरीची वाट धरलेल्या छाया रामराव निर्मळ (वय ६५) या आजीबाईंनी भंडीशेगाव ता. पंढरपूर या गावाजवळ बुधवारी जगाचा निरोप घेतला. पांडुरंगाच्या भेटीआधीच त्यांच्या जाण्याने पाटोदा तालुक्यातील दासखेड गावावर शोककळा पसरली आहे.

    पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील वारकरी छाया रामराव निर्मळ (वय ६५) या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील १९४ क्रमांकाच्या दिंडीत सहभागी होऊन पंढरीची वाट चालत होत्या. बुधवारी ही दिंडी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव या गावाजवळ आली असता सकाळी ११ वाजता छाया निर्मळ यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केवळ १० किलोमीटर अंतरावर पंढरपूर राहिले होते. पांडुरंगाच्या भेटीआधीच छायाबाईंना मरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.दासखेड येथील छाया निर्मळ या मागील पाच वर्षांपासून आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात बोधले महाराज यांच्या दिंडीत सहभागी होत होत्या. यंदा १९४ क्रमांकाच्या दिंडीत त्या सहभागी झाल्या होत्या.  
 

Advertisement

Advertisement