भूम दि.२८ (प्रतिनिधी) : तालुक्यातील हाडोंग्री गावाच्या हद्दीत धक्कादायक व अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. शेतात जादुटोणा व आघोरी कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हाडोंग्री येथील बाळासाहेब भगवंतराव पाटील हाडोंग्रीकर यांच्या शेत गट क्रमांक 101 मध्ये चरण्यासाठी सोडलेली जनावरे आणण्यासाठी गेले असता शेतातील कडू लिंबाच्या झाडाला कुत्र्याचे मागील दोन्ही पाय दोरीने बांधून उलटे लटकवलेले आढळून आले. कुत्र्याच्या तोंडाजवळ जळालेल्या लाकडांचे अवशेष दिसून आले असून कुत्र्याचा छळ करून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.याच ठिकाणी दोरीने बांधलेली गाय किंवा बैलाच्या डोक्याची कवटी लोंबकळत असून तिला कवड्यांची माळ अडकवलेली होती. झाडाखाली हिरव्या रंगाचे कापड, त्यावर हळदी-कुंकू, पान-सुपारी, आसुड, हिरव्या बांगड्या तसेच लाल रंगाचे कापड आढळून आले. झाडाला हिरव्या रंगाची साडी बांधलेली असल्याचेही दिसून आले. हे सर्व साहित्य जादुटोणा व करणीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी सुनिल दादाराव कचरे (वय 40, रा. हाडोंग्री) यांनी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व 3(2) आघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 11(1) च्या कलमान्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 0051/2026 असा नोंद असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीगणेश साहेबराव कांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

