वडवणी दि.१०(प्रतिनिधी): पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेत बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) थेट सांगली गाठले. तेथील एका उसाच्या फडातून पीडित मुलीची सुटका करत बीड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
वडवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होतो नुकताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता, पीडित मुलगी व आरोपी सांगली जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथक सोमवार (दि.८) रोजी सांगलीला रवाना झाले.दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास आरोपी आणि पीडित मुलगी ऊस तोडून कोपीवर परतताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांना बीडला आणण्यात आले असून पुढील तपासासाठी वडवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पल्लवी जाधव, हवालदार उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, योगेश निर्धार आणि अश्विन सुरवसे यांच्या पथकाने केली.

